Home Cities रावेर क्षमता विकास प्रबोधिनीच्या चार विद्यार्थ्यांची केंद्रीय सुरक्षा दलात निवड

क्षमता विकास प्रबोधिनीच्या चार विद्यार्थ्यांची केंद्रीय सुरक्षा दलात निवड


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धनाजी नाना महाविद्यालयातील कै. दामोदर नाना क्षमता विकास प्रबोधिनीने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची आणि मार्गदर्शन परंपरेची मोहोर उमटवली असून अभ्यास केंद्रातील चार विद्यार्थ्यांची केंद्रीय सुरक्षा दलात निवड झाल्याने शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची विश्वासार्हता अधोरेखित झाली आहे.

दिल्लीमार्फत जानेवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय सुरक्षा दलांच्या स्पर्धा परीक्षेत कोळी कुणाल रवींद्र आणि सोनवणे वैभव विलास यांची CISF (सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स) आर्मी कॉन्स्टेबल पदावर निवड झाली आहे. त्याचप्रमाणे मेढे रोहित दिवाकर आणि मराठे चेतन राजू यांची BSF (सीमा सुरक्षा दल) मध्ये निवड झाल्याने या चारही विद्यार्थ्यांनी संस्थेचे नाव उज्वल केले आहे.

ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या कै. दामोदर नाना क्षमता विकास प्रबोधिनीच्या अभ्यास केंद्रातून मिळालेल्या शिस्तबद्ध प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि नियमित सरावामुळे हे यश शक्य झाल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाला योग्य दिशा मिळाल्याने केंद्रीय स्तरावरील स्पर्धेत त्यांना यश प्राप्त झाले आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे तापी परिसर विद्यामंडळाचे आमदार शिरीषदादा चौधरी, उपाध्यक्ष डॉ. एस. के. चौधरी, उपाध्यक्ष मिलिंददादा वाघुळडे, चेअरमन श्री. लिलाधर चौधरी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळडे, उपप्राचार्य डॉ. सुरवाडे, डॉ. कल्पना पाटील, डॉ. हरीश तळेले, प्रबोधिनी समन्वयक डॉ. शरद बिऱ्हाडे तसेच ग्रंथपाल धनश्री प्रमोद बोरोले यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या यशामुळे भविष्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून प्रबोधिनीच्या कार्यपद्धतीवर पालक व विद्यार्थ्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. येत्या काळात आणखी विद्यार्थी केंद्रीय व राज्यस्तरीय सेवेत निवड होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound