पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील विष्णूनगर (गाळण) येथील २४ वर्षीय विवाहितेच्या मृत्यू मागील कारणाचा उलगडा शवविच्छेदनानंतर झाला असून विवाहितेचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पतीसह चार जणांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक केली आहे.
मनिषा चेतन राठोड (वय-२४) रा. विष्णू नगर (गाळण) ता. पाचोरा जि.जळगाव असे मयत विवाहितेचे नाव आहे.
विष्णुनगर ता. पाचोरा येथे कुंडाणे तांडा ता. धुळे येथील माहेर असलेल्या विवाहिता मनिषा हिचा ४ फेब्रुवारी रात्री खाटेवरच गळा आवळून खून करण्यात आला होता. मात्र सासरच्या मंडळींनी तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बतावणी केल्याने पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र मनिषा हिच्या गळ्यावर दोरी आवळ्याच्या व नखे लागल्याच्या खुना आढळून आल्याने तिचा भाऊ ज्ञानेश्वर जग्गनाथ पवार याने मनिषा हिचे शवविच्छेदन पाचोरा येथे न करता इनकॅमेरा जळगाव येथे करण्याची मागणी केल्याने आज शनिवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान जळगाव जिल्हा रुग्णालयाचे डॉ. सोनार यांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करुन पाचोरा पोलिसांना अहवाल सादर केला. त्या अवहालात मनिषा राठोड हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू नसुन तो दोरीने गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने ज्ञानेश्वर पवार यांनी चेतन दलेरसिंग राठोड (पती), सयाबाई जयसिंग राठोड (जेठानी), जयसिंग दलेरसिंग राठोड (जेठ), भगवान दलेरसिंग राठोड (दिर) यांचे विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला.
काय आहे हा प्रकार
मनिषा राठोड हिचा विवाह गेल्या दोन वर्षांपूर्वी झाला होता. विवाह झाल्यानंतर दोन महिन्यांपासूनच विवाहात कमी हुंडा दिला व संसार उपयोगी भांडे दिले नाही. यावरुन तिला पतीसह सासरची मंडळी सतत त्रास देत असत. मनिषा हिचा पती चेतन याचे त्याची मोठी वहिनी सयाबाई जयसिंग राठोड हिच्याशी अनैतिक संबंध होते. ही बाब मनिषा हिने प्रत्यक्ष पाहुन पतीस विचारणा केल्याने त्याचा राग येवुन पती चेतन दलेरसिंग राठोड, जेठानी सयाबाई जयसिंग राठोड, जेठ जयसिंग राठोड, दिर भगवान राठोड यांनी मनिषा हिचा कायमचा काटा काढला. मनिषा हिस पती चेतन पासून ९ महिण्याचा यश नावाचा मुलगा असुन त्यास चेतन याचेकडे सोपविण्यात आले आहे. मनिषा हिच्या कुंडाणे तांडा येथे अश्रुनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे हे करीत असुन खुनातील चेतन राठोड (पती), जयसिंग राठोड (जेठ) व भगवान राठोड (दिर) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.