जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुलाला मारहाण होत असल्याने त्याला सोडविण्यासाठी गेलेल्या आईसह तरुणाचा भाऊ, मेहुणे यांच्यावर धारदार वस्तूने वार केल्याने चार जण जखमी झाले. ही घटना १५ मार्च रोजी रात्री आझादनगरात घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अगोदर झालेल्या भांडणाच्या कारणावरून दिनेश मनोज अहिरे (रा. आझादनगर) याला चार जण मारहाण करीत असल्याने तेथे त्याची आई फरिदाबी उर्फ दिया मनोज अहिरे, भाऊ राज मनोज अहिरे, मेहुणे नारायण राजूभाई मारवाडी हे त्याच्या बचावासाठी गेले. त्या वेळी मारहाण करणाऱ्यांनी मारवाडी यांच्या हातावर, फरिदाबी यांच्या पोटावर, राज याच्या डोळ्याच्या वर, मानेवर धारदार वस्तूने वार केले. त्यामुळे हे सर्व जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी राज अहिरे याने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.