अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील पायी जाणाऱ्या एकाच्या हातातून दोन मोबाईल लांबविणाऱ्या चार संशयित आरोपींना अमळनेर पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेले दोन्ही मोबाईल हस्तगत केले असून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, “अमळनेर शहरातील गणेश कॉलनीत राहणारे उल्हास बाजीराव सावंत हे दि,२४ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुकान बंद करून अंमळनेर शहरातून धुळे रोडकडे पायी जात असतांना अज्ञात दोन अनोळखी व्यक्ती वेगवेगळ्या दुचाकीवर येऊन त्यांच्या हातातील अनुक्रमे ८ हजार रुपये आणि १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल जबरी लांबविले होते.
याप्रकरणी उल्हास सावंत यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे विभागाकडून तांत्रिक मदत घेत गोपनीय माहिती काढून पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तपास अधिकारी अनिल भुसारे पोलीस, शरद पाटील, पोलीस नाईक सिद्धांत शिसोदे, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र देशमाने यांनी धुळे व मालेगाव येथून संशयित आरोपी खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळ (वय-२१) रा. दंडेवाल बाबा नगर ता. जि. धुळे याला १५ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आले होते.
दरम्यान पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी संशयित आरोपी खुशाल मोकळ याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून इतर तीन साथीदारांची नावे सांगितली. यात रितिक उर्फ दादू राजेंद्र राजपूत (वय-२०) रा. पवार नगर, चाळीसगाव रोड, धुळे, शेख शहेजाद शेख साजिद हसन (वय-२१) रा. जाफर नगर मालेगाव आणि शेख शकील रईस अहमद (वय-२१) रा. जाफर नगर मालेगाव असे ३ संशयित यांची नावे सांगितली. त्यानुसार अमळनेर पोलिसांनी या तिन्ही संशयित आरोपींना अटक केले. यात चारही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी चौघांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी संशयित आरोपी यांची मागील गुन्ह्यांची तपासणी केली असता यातील संशयित आरोपी खुशाल मोळक याच्यावर मुंबई नाका पोलीस स्टेशन, गंगापूर पोलीस स्टेशन नाशिक, अंबड पोलीस स्टेशन नाशिक, मालेगाव छावणी पोलीस स्टेशन, मालेगाव तालुका पोलीस स्टेशन, जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन असे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. तर दुसरा संशयित आरोपी रितिक राजपूत याच्यावर गंगापूर पोलीस स्टेशन नाशिक, मालेगाव छावणी पोलीस स्टेशन, उपनगर पोलीस स्टेशन नाशिक, मालेगाव तालुका पोलीस स्टेशन आणि जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन या ठिकाणी वेगवेगळे ५ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.