माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचा भाजपाला जय महाराष्ट्र

हिंगोली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा हिंगोली लोकसभेच्या माजी खासदार सुर्यकांता पाटील यांनी अखेर भाजपाला जय श्रीराम करीत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपाला हिंगोली व नांदेड जिल्ह्यात मोठा धक्का मानला जात आहे.

माजी मंत्री सुर्यकांता पाटील यांनी १९८० ते १९८५ या कालावधीत हदगाव विधानसभेच्या काँग्रेसच्या आमदार म्हणून काम पाहिले. त्यानंतर सन १९८६ ते १९९१ या कालावधीत काँग्रेसपक्षाच्या राज्यसभा सदस्य होत्या. तसेच १९९१ ते १९९६ मध्ये त्यांनी नांदेड लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला. काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना राष्ट्रवादीने २००४ मध्ये हिंगोली लोकसभेची उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळविला होता. केंद्रामध्ये त्यांना राज्यमंत्री पद देण्यात आले होते. दरम्यान, सन २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला होता. मागील दहा वर्षापासून त्या भाजपामध्ये होत्या. भाजपामध्ये १० वर्ष काम केल्यानंतर त्यांनी नुकताच भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा पाठविला आहे.

मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा तथा माझ्या हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा देत आहे. आपल्या सोबत गेल्या १० वर्षात खूप काही शिकता आले. तालुक्यात बुथ कमीटीपर्यंत काम केले. आपण दिलेल्या संधीसाठी मी आपली व भारतीय जनदता पार्टीची अत्यंत आभारी आहे. मी आपला निरोप घेत आहे. प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न केला पण आपल्या व्यस्ततेमुळे ते शक्य झाले नाही. कोणतीही कटुता मनात न ठेवता राजीनामा देत आहे तो स्विकारावा हि नम्र विनंती असे या राजीनामा पत्रात नमुद केले आहे. दरम्यान, माजी केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांच्या राजीनाम्यामुळे भाजपाला नांदेड व हिंगोली जिल्हयात धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे. या संदर्भात माजीमंत्री पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राजीनामा दिल्या असल्याचे सांगत पुढील भुमीकेबाबत ‘वेट ॲण्ड वॉच’ असे स्पष्ट केले.

Protected Content