जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मू.जे. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. अनिल राव यांनी एक अनोखा आणि हृदयस्पर्शी कार्यक्रम आयोजित करत महाविद्यालयातील सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एकत्र बोलावून स्नेहभोजन दिले. या कार्यक्रमाला ४५ सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती, कारण आजवर कोणत्याही प्राचार्याने अशाप्रकारे सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी कौटुंबिक चौकशी करत भोजनाचे आयोजन केले नव्हते.
या स्नेहभोजन सोहळ्यात अनिल राव सरांनी सर्व कर्मचाऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांनी प्रत्येक शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची आणि आरोग्याची चौकशी केली, तसेच आपल्या स्वतःच्या कुटुंबाचीही माहिती दिली. सर्वांनी एकत्र भोजनाचा आनंद घेतला, ज्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

यावेळी अनेक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या महाविद्यालयातील जुन्या आठवणी सांगितल्या आणि त्या आठवणींना नव्याने उजाळा दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगशिक्षक श्री. सुनील गुरव आणि श्री. मोहन तायडे यांनी केले. दोघांनीही काही सिनेगीते, कविता आणि भक्तिगीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
अनिल राव सर या कार्यक्रमाला सहकुटुंब उपस्थित होते. हा कार्यक्रम अत्यंत छान आणि अप्रतिम झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. रावसरांनी स्वखर्चाने भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती, ज्यामुळे त्यांच्या औदार्याचे आणि माणुसकीचे दर्शन घडले. याप्रसंगी योगशिक्षक सुनील गुरव यांनी अनिल राव सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. अनिल राव सरांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.



