लाहोर (वृत्तसंस्था) पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पेशावरमधील विशेष न्यायालयाने २००७ मध्ये पाकिस्तानात जारी करण्यात आलेली आणीबाणीच्या खटल्यामध्ये त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या खटल्यात विशेष न्यायालयाने आज मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. मुशर्रफ सध्या पाकिस्तानात नाहीत. त्यांच्यावर दुबईत उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच मुशर्रफ यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आरोग्याबाबत माहिती दिली होती. मी कोणत्या परिस्थितीत आहे हे चौकशी आयोगाने येऊन पाहावे, असे ते म्हणाले होते. न्यायमूर्ती वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय खंडपीठाने 2-1 ने निर्णय देताना, मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. एखाद्या लष्करप्रमुखावर देशद्रोहाचा आरोप केला जाण्याची पाकिस्तानमधील हे पहिलेच प्रकरण होते. अशा वेळी, ही कारवाई टाळण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने या प्रकरणामध्ये उडी घेत आपल्या माजी प्रमुखांचा बचाव करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामुळे नवीनच पेच उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. असे घडल्यास देशातील लोकशाही चौकटीस धक्का लागू शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत होते.