पाकिस्तानी माजी आमदाराला हवा भारतात राजकीय आश्रय

pakistani aamdar

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | काश्मीरमधील जनतेवर अत्याचार होत असल्याची सतत गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानला आता तेथील जनताच आरसा दाखवण्याचे काम करतेय. पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पक्षाचे माजी आमदार बलदेव कुमार सिंह पाकिस्तान सोडून भारतात आले आहेत. पंजाबमध्ये आल्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजकीय आश्रयस्थान द्यावा अशी विनंती केली आहे.

 

४३ वर्षीय बलदेव कुमार यांनी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असल्याचे म्हटले आहे. “केवळ अल्पसंख्यांकच नव्हे तर मुस्लीम देखील पाकिस्तानात सुरक्षित नाहीयेत. बऱ्याच अडचणींना तोंड देत आम्ही पाकिस्तानात जगतोय. मी आता तिकडे परत जाणार नाही. भारत सरकारने पाकिस्तानातील हिंदू आणि शीख कुटुंबीयांसाठी एखादे पॅकेज जाहीर करावे, जेणेकरुन ते पाकिस्तानातून भारतात परततील. मोदींनी त्यांच्यासाठी काहीतरी करावे, त्यांच्यावर तेथे प्रचंड अत्याचार होत आहेत”, अशी मागणी बलदेव यांनी केली आहे.

बलदेव कुमार सिंह हे सध्या तीन महिन्यांच्या व्हिसावर भारतात आले आहेत. स्वतः भारतात दाखल होण्यापूर्वीच बलदेव यांनी त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलांना लुधियानातील त्यांच्या नातेवाईकांकडे पाठवले आहे. इम्रान खान यांनी दिलेले एकही वचन पूर्ण केले नाही. हिंदू-शीख तर सोडूनच द्या त्यांनी मुस्लिमांसाठीही काहीच केले नाही. पाकिस्तानात सध्या सगळेच त्रस्त आहेत, असेही ते म्हणाले.

Protected Content