माजी खासदार हिना गावित यांचा भाजपला ‘जय श्रीराम’

नंदूरबार-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी खासदार हिना गावित यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम केला आहे. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा व पक्षातील सर्व पदांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे. हिना गावित या भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या देखील होत्या. लोकसभेच्या नंदुरबार मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर डॉ. हिना गावित यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. हिना गावित या मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत. त्यांनी अक्कलकुवा मतदारसंघात भाजपा व महायुतीविरोधात बंडखोरी केली आहे.

त्यांनी अक्कलकुवा मतदारसंघातून विधानसभेचा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे. त्यानंतर नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्षश्रेष्ठी त्यामध्ये अपयशी ठरले आहेत. त्यानंतर आता गावितांनी भाजपाला रामराम केला आहे. महायुतीत अक्कलकुवा हा मतदारसंघ भाजपाला मिळावा व भाजपाने आपल्याला उमेदवारी द्यावी अशी हिना गावित यांची इच्छा होती. मात्र, तसं होऊ शकलं नाही. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात महायुतीत अक्कलकुवा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वाट्याला गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथून विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या हिना गावितांनी येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता त्यांनी पक्षालाही रामराम केला आहे.

Protected Content