शिवसेनेच्या माजी आमदारांची सहा महिन्यात शिंदेकडून ठाकरे गटात घरवापसी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्राची विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोनच दिवस बाकी असताना उद्धव ठाकरेंच्या शिवेसेनेने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिंदेंच्या पक्षातील माजी आमदाराने उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेनेचे (शिंदे) उपनेते व माजी आमदार बबनराव घोलप यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे.

घोलप यांनी काल शनिवारी २६ ऑक्टोबर रोजी शिंदे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आज त्यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मनगटावर शिवबंधन बांधून घरवापसी केली आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने (ठाकरे) पुत्र योगेश घोलप यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत (शिंदे) गेलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आज घरवापसी केली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये आता भाजपापाठोपाठ आता शिवसेनेलाही (शिंदे) गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. वाकचौरेंबरोबरच्या संघर्षामुळे बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. मात्र आता त्यांची घरवापसी झाली आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी वाकचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यानंतर भाजपात आणि आता ते पुन्हा शिवसेनेत (ठाकरे) परतले आहेत. मात्र वाकचौरेना पक्षात प्रवेश दिल्यानंतर शिर्डीतील माजी आमदार व माजी मंत्री बबनराव घोलप नाराज झाले आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षात गेले. मात्र आता ते उद्धव ठाकरे यांच्याकडे परतले आहेत.

Protected Content