रावेर, शालीक महाजन | जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काय काय बघायला मिळेल याची कुणीही खात्री देऊ शकत नाही. असाच एक अफलातून किस्सा रावेर तालुक्यात घडला असून राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना भाजपने पुरस्कृत केल्यानंतर चक्क कॉंग्रेसच्या उमेदवाराने जाहीर पाठींबा दिल्याने एकच धमाल उडाली आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जगासमोर आणि पडद्याआड घडणार्या हालचाली पाहून सर्वसामान्य अक्षरश: थक्क झाले आहेत. यातील पुढील अध्याय हा रावेर तालुक्यात घडला आहे. रावेर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात अतिशय नाट्यमय घडामोडी झाल्या. राष्ट्रवादीचे माजी आमदार अरूण पांडुरंग पाटील यांना महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी थेट भाजपचा पाठींबा घेतला. यानंतर काल माघारी नंतर माजी आमदार अरुण पाटील, जनाबाई गोंडू महाजन राजीव पाटील हे तिन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. अर्थात रावेरात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र आज स्पष्ट झाले होते. मात्र आज यात पुन्हा ट्विस्ट आला आहे.
आज दुपारी महाविकास आघाडीतील कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार जनाबाई गोंडू महाजन यांनी अरुण पांडुरंग पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्याने रावेरात खळबळ उडाली आहे. जनाबाई महाजन यांनी पाठिंब्याचे पत्र अरुण पाटील यांच्याकडे त्यांचे पती गोंडू महाजन यांच्यावतीने दिले. यामुळे राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना भाजपने पुरस्कृत केले असून त्यांना कॉंग्रेसच्या उमेदवाराने पाठींबा दिल्याचे चमत्कारीक चित्र तालुक्यात निर्माण झाले असून याबाबत खमंग चर्चा सुरू आहे.
दरम्यान, याहून आश्चर्याची बाब म्हणजे भाजपने पुरस्कृत करून देखील स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीचे समस्त पदाधिकारी हे अरूण पांडुरंग पाटील यांच्या पाठीशी उभे असल्याचे चित्र आज दिसून आले आहे. यात राष्ट्रवादीचे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, बाजार समितीचे संचालक डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. सुभाष पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, नितीन पाटील , मंदार पाटील, सिताराम पाटील आदींसह इतरांचा समावेश आहे. यामुळे तालुक्यातून आता अरूण पांडुरंग पाटील यांच्या विरूध्द राजीव पाटील अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.