यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपरिषद निवडणुकीची घोषणा होताच शहरातील राजकीय वातावरणात चुरस पाहायला मिळत आहे. यंदा नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने महिला नेतृत्वाला पुढे येण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या पत्नी सौ. छाया पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या प्रचाराला शहरातून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे.

सौ. छाया पाटील या पती अतुल पाटील यांच्यासह शहरातील प्रत्येक गल्ली–बोळात, प्रत्येक घरी पोहोचून नागरिकांशी संवाद साधत आहेत. ‘‘यावल शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास,’’ असे सांगत त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात मूलभूत सुविधा, स्वच्छ प्रशासन, पारदर्शक कामकाज आणि महिलांच्या सबलीकरणासाठी नवे उपक्रम राबवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. नागरिकांच्या विश्वासाशिवाय हे कोणतेही ध्येय साध्य होऊ शकत नाही, असे त्या प्रत्येक मतदाराला सांगत आहेत.

प्रचारादरम्यान शहरातील नागरिक पाटील दाम्पत्याचे मनपूर्वक स्वागत करत असून अनेक ठिकाणी महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे. शहराच्या विकासात पाटील कुटुंबाचा सातत्यपूर्ण सहभाग असल्याने छाया पाटील यांच्या उमेदवारीकडे नागरिक आशेने पाहत असल्याचे चित्र जनसंपर्क यात्रेतून स्पष्ट होत आहे.
येणाऱ्या निवडणुकीत यावल शहराच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिण्याचे आश्वासन देत छाया पाटील यांनी नागरिकांचा पाठिंबा मागितला असून, पुढील काही दिवसांत प्रचार अधिक वेग धरण्याची शक्यता आहे.



