दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंह यांचे शनिवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ९३ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नटवर सिंह यांचे दिल्लीजवळील गुरुग्रामयेथील मेदांता रुग्णालयात निधन झाले. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नटवर सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘नटवर सिंह यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. मुत्सद्देगिरी आणि परराष्ट्र धोरणाच्या जगात त्यांनी भरीव योगदान दिले. ते आपल्या बुद्धीमत्तेसाठी तसेच विपुल लेखनासाठी ही ओळखले जात होते. या दु:खाच्या काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि चाहत्यांसोबत आहेत,’ अशी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
नटवर सिंह हे काँग्रेसचे माजी नेते होते. देशाच्या प्रतिष्ठेच्या परराष्ट्र सेवेत अनेक दशके घालवल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नटवर सिंह यांचा जन्म १९३१ मध्ये राजस्थानमधील भरतपूर येथे झाला. मुत्सद्देगिरीतील अनुभवाचा खजिना आपल्या राजकीय कारकीर्दीत आणणारे ते करिअर डिप्लोमॅट होते आणि महाराजांच्या जीवनापासून ते परराष्ट्र व्यवहारातील बारकावे या विषयांवरील विपुल लेखक होते.