चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपड्यात आज झालेल्या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीमुळे शहरातील राजकारणाला नवा कलाटणी मिळाली आहे. माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. येत्या चोपडा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जळगावचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाजन दाम्पत्याने भाजपचा झेंडा हाती घेतला. या प्रवेशामुळे भाजपला चोपड्यात नवचैतन्य लाभले असून आगामी निवडणुकीत पक्षाच्या स्थितीत मजबुती येणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

या कार्यक्रमाला जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित निकम, माजी नगराध्यक्ष जीवन भाऊ चौधरी, भाजप जळगाव पूर्वचे महामंत्री राकेश पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, तालुका अध्यक्ष कांतीलाल पाटील आणि शहराध्यक्ष नरेंद्र पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पक्ष प्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमात बोलताना रोहित निकम म्हणाले, “भाजपच्या विचारसरणीवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’च्या ध्येयावर नागरिकांचा वाढता विश्वास दिसून येत आहे. चोपड्यात विकासाच्या नव्या युगाची सुरुवात झाली असून अनुभवी नेतृत्व आणि तरुण ऊर्जेचा संगम आगामी निवडणुकीत निश्चितपणे सकारात्मक बदल घडवेल.”
संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे स्थानिक पातळीवर पक्ष संघटन अधिक बळकट होणार आहे. महाजन दाम्पत्य हे शहरातील सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय असून त्यांच्या अनुभवाचा लाभ भाजपला मिळणार आहे.
चोपड्यातील आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून नव्या उमेदवारांची फळी तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, या मोठ्या प्रवेशामुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल घडण्याची शक्यता आहे.



