
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांच्या मुलाचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे. मंगळवारी दुपारी रोहित शेखर तिवारी डिफेन्स कॉलनीतील घरामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते.
रोहित शेखर तिवारी यांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रोहित यांच्या नाकातून रक्त आले होते. त्यांच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन करण्यासाठी एम्समध्ये नेण्यात आले होते. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून प्राथमिक तपासात त्यांचा मृत्यू ब्रेन हॅमरेज किंवा हृदयविराच्या झटक्याने झाला असल्याचा अंदाज आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच खरे कारण समजू शकणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रोहित हे त्यांची पत्नी अपूर्वा शुक्ला आणि आई उज्ज्वला शर्मा यांच्यासोबत राहत होते.