Home क्राईम निलंबन टाळण्यासाठी लाच घेणारा वनपाल ‘एसीबी’च्या जाळ्यात

निलंबन टाळण्यासाठी लाच घेणारा वनपाल ‘एसीबी’च्या जाळ्यात


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वनविभागातील कर्मचाऱ्याचे निलंबन टाळण्यासाठी आणि नंतर निलंबनातून मुक्त करण्यासाठी वरिष्ठांच्या नावाने १५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अहिरवाडी येथील वनपाल राजेंद्र अमृत सरदार आणि त्याचा खासगी हस्तक दीपक रघुनाथ तायडे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. डिजिटल माध्यमांचा वापर करून लाच स्वीकारणाऱ्या या वनपालामुळे वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे जिन्सी वनक्षेत्रात वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामाची तपासणी झाल्यानंतर, आरोपी वनपाल राजेंद्र सरदार याने त्यांना व्हॉट्सॲप कॉल करून “तुमचे निलंबन होणार आहे, ते टाळायचे असल्यास साहेबांना १५ हजार रुपये द्यावे लागतील,” असे सांगितले. तक्रारदाराने ७ आणि ८ सप्टेंबर २०२४ रोजी आरोपीचा मित्र दीपक तायडे याच्या ‘फोन पे’वर १३ हजार २५० रुपये आणि वनपालाच्या शासकीय निवासस्थानी १ हजार ७५० रुपये रोख, अशी एकूण १५ हजार रुपयांची लाच दिली.

धक्कादायक बाब म्हणजे, लाच देऊनही १२ सप्टेंबर रोजी तक्रारदाराला निलंबित करण्यात आले. जेव्हा तक्रारदाराने विचारणा केली, तेव्हा वनपाल सरदार याने पुन्हा “मी वरिष्ठांना सांगून निलंबन रद्द करून देतो, त्यासाठी पुन्हा पैसे तयार ठेव,” असे सांगून वैयक्तिक प्रभावाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केली असता, वनपाल सरदार याने पंचांसमक्ष पूर्वी घेतलेली १५ हजार रुपयांची लाच मान्य केली. तसेच, आरोपी दीपक तायडे याने लाचेची रक्कम आपल्या फोन पे वर स्वीकारून ती एटीएममधून काढून वनपालाला देण्यात मदत केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक हेमंत नागरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound