
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील वनविभागात लाचखोरीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वनरक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

यावल पूर्व विभागाच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत असलेले वनरक्षक भैय्यासाहेब भिमराव गायकवाड यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे यावल तालुक्यातील असून ते दोन बोलेरो पिकअप वाहनांच्या साहाय्याने अंजाळे, पाडळसा व परिसरात लाकूड वाहतुकीचा व्यवसाय करतात. त्यांच्या या व्यवसायात अडथळा आणू नये आणि कोणतीही कारवाई करू नये यासाठी संबंधित वनरक्षकाने तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी तक्रारदाराने २० मार्च रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकृत तक्रार नोंदविली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACB पथकाने त्याच दिवशी सापळा रचून कारवाई केली. या सापळ्यात आरोपी वनरक्षकाने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. पुढे तडजोडीअंती ९ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी आरोपीने दर्शविली होती. मात्र, प्रत्यक्ष पैसे स्वीकारताना संशय आल्याने आरोपीने लाच रक्कम स्वीकारली नाही. तरीदेखील लाच मागणीचे पुरावे मिळाल्याने त्याच्याविरुद्ध फैजपूर (ता. यावल) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान आरोपी वनरक्षकाच्या अंगझडतीत ९ हजार ४० रुपये रोख रक्कम आणि दोन मोबाइल फोन जप्त करण्यात आले. या मोबाइल फोनची पुढील तपासणी करण्यात येणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस कर्मचारी बाळू मराठे, सुरेश पाटील आणि राकेश दुसाने यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत.



