जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आता चोरट्यांनी आपला मोर्चा मद्यविक्री केंद्रांकडे वळवला आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आव्हाणे रोडवरील ‘हॉटेल न्यू नाईट किंग अँड वाईन पॅलेस’ या बिअर बारमध्ये धाडसी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमोल गोपाळ साळी (वय ३९, रा. राजराजेश्वरी अपार्टमेंट, जळगाव) यांचे आव्हाणे रोडवरील हॉटेल न्यू नाईट किंग अँड वाईन पॅलेस नावाचे बिअर बार आहे. मंगळवारी २४ मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजेपासून २५ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या त्यांचे दुकान बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी हॉटेलच्या खिडकीचे लोखंडी ग्रील शिताफीने वाकवून आत प्रवेश केला. हॉटेलमध्ये कोणाचेही लक्ष नसताना चोरट्यांनी काउंटर आणि स्टोअरमधून १५ हजार ८३० रुपये किमतीच्या विदेशी दारू आणि बिअरच्या बाटल्या लंपास केल्या. हा प्रकार बुधवारी २५ मार्च रोजी सकाळी ८ वाजता समोर आला. याप्रकरणी अमोल साळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ धनराज पाटील हे करीत आहे.




