धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पथराड येथून हरियाणातून चोरी करण्यात आलेल्या बुटांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, फरिदाबाद (हरियाणा) येथून ९३ लाखाचा बाटा कंपनीचे बुट असलेला माल चोरीस गेला होता. दरम्यान, जामनेर तालुक्यातील मूळ रहिवासी असणार्या अक्षय पाटील याच्याविरूध्द या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झालेला आहे. दरम्यान, अक्षय पाटील याने पथराड येेथे भाड्याने खोली घेऊन तो साठा करून ठेवला असल्याची गुप्त माहिती हरियाणा पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने तेथील एक पथक बुधवारी तपासणीसाठी पाळधी येथे आले होते. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने या घरावर छापा मारून चोरीचे बुट जप्त केले.
पोलीस कारवाईत सुमारे २५० खोके जप्त करण्यात आली असून यांचे मूल्य सुमारे २५ लाख रूपये इतके असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यातील उर्वरित मालाचा शोध आता सुरू करण्यात आला असून या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास एपीआय एल.सी. गायकवाड, विजय चौधरी करीत आहे.