फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर व पंचक्रोशीतील भाविकांनी सामाजिक व अध्यात्मिक बांधिलकी जपत आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेस सुमारे सात लाख रुपयांचा अन्नदान निधी अर्पण करून एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. वारकरी परंपरेचे संवर्धन आणि गरीब, निराधार विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी दिलेला हा निधी भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक ठरत आहे.
आळंदी येथे जोग महाराज पुण्यतिथी महोत्सवाच्या पावन प्रसंगी हा अन्नदान निधी संस्थेचे ज्येष्ठ संत शांती ब्रह्म मारोती महाराज कुरेकर व संस्थेचे अध्यक्ष संदीपन महाराज शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. डिंगंबर महाराज चिनावलकर मठ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांच्या हस्ते हा निधी प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो संत, महंत व वारकरी उपस्थित होते.

जोग महाराज पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने उपस्थित संत-महंतांच्या साक्षीने नरेंद्र नारखेडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. फैजपूर पंचक्रोशीतील भाविकांनी दिलेल्या या सहकार्यामुळे संस्थेच्या कार्याला मोठे बळ मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. भविष्यातही असा मदतीचा ओघ सातत्याने सुरू राहील, असे आश्वासन नरेंद्र नारखेडे यांनी दिले.
श्री क्षेत्र आळंदी येथे कार्यरत असलेली जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था गेली सुमारे १०७ वर्षे संतविचार, कीर्तन आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून कीर्तनकार घडविण्याचे महान कार्य करीत आहे. विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी न घेणे आणि शिक्षकांनी मानधनाशिवाय सेवा देणे, या निस्वार्थ तत्त्वावर संस्थेचे कार्य अखंडपणे सुरू आहे. सध्या संस्थेत सुमारे ६०० विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यामध्ये गरीब व निराधार विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.
या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन भोजनाची व्यवस्था कायमस्वरूपी व्हावी, यासाठी स्थिर अन्नदान निधी उभारण्याचे कार्य सुरू आहे. या उद्देशाने फैजपूर व परिसरातील गावांमधून सुमारे सात लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला. श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व नथुसिंग बाबा राजपूत दौरा मंडळाने संयुक्तपणे हे निधी संकलनाचे कार्य पार पाडले आणि तो निधी आज जोग महाराज पुण्यतिथी महोत्सवात संस्थेस अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वस्त अनिल महाराज बार्शीकर यांनी केले. यावेळी सचिव बाजीराव नाना चंदिले, तुकाराम महाराज मुळीक, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, पांडुरंग महाराज घुले, पंढरीनाथ आरु, परमेश्वर जायभाये, रामराव महाराज ढोक, मुखेकर शास्त्री, नलावडे राजे महाराज, कन्हेया महाराज राजपूत, संजय राजपूत, हेमराज महाराज, नरहरी महाराज चौधरी, पोपट महाराज कासारखेडेकर, उल्हास बाबा सूर्यवंशी, संदीप येवले, गोविंद महाराज वरसाडेकर यांच्यासह वारकरी संप्रदायाचे साधक, विद्यार्थी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



