Home क्राईम अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई ; १५१ किलोग्रॅम मिठाई जप्त

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई ; १५१ किलोग्रॅम मिठाई जप्त


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयाकडून जिल्ह्यात विशेष तपासणी मोहिम राबवण्यात येत असून, या मोहिमेअंतर्गत शिरसोली प्र.न. येथील एका मिठाई उत्पादकावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

मिठाई तयार करण्यात येणाऱ्या घटकांच्या गुणवत्तेवर व विक्रीसाठी ठेवलेल्या साठ्यावर संशय आल्याने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मे. चौधरी स्वीट्स अँड नमकीन या प्रतिष्ठानवर मंगळवार, दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी अचानक धाड टाकली. तपासणीदरम्यान पेढा, बुंदी लाडू, म्हैसूर पाक, गोड गावा आदी मिठाई कमी प्रतीची असल्याचे आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार उत्पादन योग्य न मिळाल्याचे निष्पन्न झाले. या ठिकाणाहून नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.

यावेळी मिळालेल्या मिठाईच्या एकूण १५१ किलोग्रॅम साठ्याची किंमत २४,१३० रुपये इतकी असल्याचे स्पष्ट झाले असून, सदर साठा नाशवंत स्वरूपाचा असल्यामुळे तो तात्काळ नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाई विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ही धडक कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी  कि. आ. साळुंके, प्रशिक्षणार्थी अन्न सुरक्षा अधिकारी आकाश बोहाडे, योगराज सुर्यवंशी, सौ. आकांक्षा खालकर व सौ. पद्मजा कढरे यांनी संयुक्तरित्या केली. संपूर्ण तपासणी व कारवाई ही सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, जळगाव श्री. संतोष कृ. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

संपूर्ण जिल्ह्यात अशा प्रकारे अस्वच्छ व दर्जाहीन अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त श्री. कांबळे यांनी अधिकृत प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. नागरिकांनीही अशा विक्रेत्यांविषयी सतर्क राहून माहिती प्रशासनास देण्याचे आवाहन त्यांनी केले.

या धडक मोहिमेमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या मिठाई व्यवसायांवर अंकुश बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound