Home राजकीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर सावद्यात कडकडीत बंद

अजितदादा पवार यांच्या निधनानंतर सावद्यात कडकडीत बंद


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने संपूर्ण राज्यासह सावदा शहरावर शोककळा पसरली असून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बुधवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील नागरिक, व्यापारी व विविध राजकीय पदाधिकारी यांनी एकत्र येत दिवंगत नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनाची बातमी सकाळी समजताच सावद्यातील वातावरण शोकमय झाले. राज्याच्या तसेच सावदा शहराच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान मोठे असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. त्यांच्या अचानक जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी २९ जानेवारी रोजी सावदा शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते.

या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली. मुख्य बाजारपेठा, व्यापारी संकुले तसेच शहरातील प्रमुख रस्ते दिवसभर ओस पडलेले दिसून आले. शहरात सर्वत्र शांतता आणि शोकमय वातावरण अनुभवायला मिळाले. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिस प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावदा यांच्या वतीने दिवंगत नेत्याला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. या प्रसंगी नगरसेविका विजया जावळे, रेखा वानखेडे, सुभद्राबाई बडगे, कुशल जावळे, अक्षय सोनवणे, भुरा मेंबर, विकी भंगाळे, वेडू तायडे, शेराभैय्या, बाबुमेंबर, अजय चौधरी, ललित महाजन, पंकज बडगे, कौशल धांडे, अश्रफ तडवी आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील व्यापारी व नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी सर्वांचे आभार मानले.


Protected Content

Play sound