अमळनेर (प्रतिनिधी) शासनाने शिक्षकांची जुनी पेंन्शन योजना बंद करून खूप मोठा अन्याय केला आहे. यासंदर्भात सर्व शिक्षक व पदवीधर आमदार याबाबत बैठक झाली असून आगामी पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी स्थगन प्रस्ताव मांडून जोपर्यंत जुनी पेंन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असे आश्वासन आ.डॉ.सुधीर तांबे यांनी दिले.
ते आज अहमदनगर येथे जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यव्यापी आयोजित मेळाव्यात बोलत होते. हा मेळावा मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समिती अहमदनगर यांनी आयोजित केला होता. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षण समितीच्या राज्याध्यक्ष संगीता शिंदे, राजेंद्र लांडे, अप्पासाहेब शिंदे , सुनील पंडित, भाऊसाहेब कचरे,अँड.गजानन क्षीरसागर, एम.एस.लगड आदी उपस्थित होते. जुनी पेन्शन योजना समन्वय समितीचे राज्याचे सर्व पदाधिकारी व राज्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत होते.