जळगाव (प्रतिनिधी) समाज माध्यमांवरील जाहिराती, भाषणे, संदेश, चित्रफिती टाकतांना आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशा पोस्ट टाकू नये, असे आवाहन सायबर पोलीस जळगाव सेलने एका पत्रकाद्वारे केले आहे.
निवडणूक आयोगाने यंदा ‘सोशल’ आचारसंहिताही लागू केली असून, मतदारांना आमिष, लालूच देण्याऱ्यांसह एखाद्या नेत्याची वा उमेदवाराची बदनामी करणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव सायबर पोलीस सेलने एक प्रसिद्ध पत्रक काढत सोशल मीडियात पोस्ट टाकतांना आचारसंहितेचा भंग होईल अशा पोस्ट टाकू नये,असे आवाहन केले आहे. तर कोणत्याही व्हाटसअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास अॅडमीनसह व संबंधित ग्रुप सदस्य जबाबदार धरत कारवाई करण्यात येईल,असा इशारा देण्यात आला आहे.