कंबोडिया- वृत्तसेवा। कंबोडियातील दुर्गम गुहांमध्ये संशोधन करताना वैज्ञानिकांना आश्चर्यचकित करणारा शोध लागला असून हवेत झेप घेत एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाणाऱ्या सापाची नवीन प्रजाती समोर आली आहे. या अनोख्या सापाच्या हालचाली आणि शिकारीच्या पद्धतीमुळे संशोधकही हैराण झाले आहेत.
कंबोडियामध्ये विविध प्रकारच्या गुहा असून त्या जैवविविधतेने समृद्ध मानल्या जातात. अलीकडील संशोधनात या गुहांमध्ये असे अनेक जीव आढळले आहेत, जे जगात इतर कुठेही आढळत नाहीत. या शोधांमध्ये उडणाऱ्या सापासह अतिशय लहान गोगलगायी, मिलिपीड्स आणि फिरोजी रंगाचा पिट वायपर साप यांचा समावेश आहे. या प्रजातींनी वैज्ञानिकांचे विशेष लक्ष वेधले आहे.

नोव्हेंबर 2023 ते जुलै 2025 या कालावधीत वैज्ञानिकांनी कंबोडियातील 10 टेकड्यांवरील 64 गुहांमध्ये सखोल सर्वेक्षण केले. ब्रिटनमधील फ्लोरा अँड फॉना या संरक्षण संस्थेने कंबोडियाच्या पर्यावरण मंत्रालय आणि स्थानिक तज्ज्ञांच्या सहकार्याने हा अभ्यास केला. या संशोधनाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यात अनेक दुर्मिळ प्रजातींचा उल्लेख करण्यात आला आहे.
या नव्या सापाची खासियत म्हणजे तो झाडांदरम्यान हालचाल करण्यासाठी आपले शरीर सपाट करून हवेत घसरत पुढे जातो. जमिनीवर न उतरता तो एका झाडावरून दुसऱ्यावर उडी मारू शकतो आणि त्याच वेळी भक्ष्यावर झडप घालतो. ही पद्धत अत्यंत वेगळी आणि प्रभावी असल्याने वैज्ञानिकांसाठी हा शोध महत्त्वाचा ठरला आहे.
कॅलिफोर्नियातील ला सिएरा युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक ली ग्रिसमर यांनी या शोधाबाबत सांगताना म्हटले की, निसर्गामध्ये उत्क्रांतीचे प्रयोग सतत सुरू असतात आणि या प्रजाती त्याचे जिवंत उदाहरण आहेत. डीएनए विश्लेषणाद्वारे या प्रजातींच्या उत्क्रांतीमागील कारणांचा अभ्यास करता येतो, ज्यामुळे जैवविविधतेचा सखोल उलगडा होतो.
या सर्वेक्षणादरम्यान सुंडा पॅंगोलिन, हिरवे मोर, लांब शेपटीचे माकड आणि नॉर्दर्न पिग-टेल्ड माकड यांसारख्या दुर्मिळ प्रजातीही आढळल्या आहेत. या प्रजातींची संख्या जागतिक स्तरावर अत्यल्प असल्याने त्यांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.



