पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा येथील तितुर नदीला पूर आल्यामुळे नदीकाठांवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून गावाचा संपर्क तुटल्याचे बोलले जात आहे.
तालुक्यातील नगरदेवळा येथील तितुर नदीच्या उगमस्थानावर झालेल्या जोरदार व संततधार पावसामुळे तितुर व डोंगरी नदीला पूर आला असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नगरदेवळा स्टेशनवरील नव्याने झालेल्या पुलाचे संरक्षक कठडे या पुरात वाहून गेले आहे. पुलाखालील भरही खचली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. परिणामी नगरदेवळेकरांचा संपर्क यामुळे तुटला असून तातडीच्या कामांसाठी गाळण मार्गे पाचोरा कडून वाहतूक सुरू आहे. नगरदेवळा ते नगरदेवळा स्टेशनला जोडणारा हा पूल नव्यानेच उभारण्यात आला होता.
कारण याआधीच्या पुलाची उंची आणि अवस्था अतिशय बिकट होती थोड्याफार प्रमाणात पाणी आले तरी गावाचा संपर्क तुटायचा त्यासाठी हा पूल उंच बांधण्यात आला होता. परंतु सदर पुलाच्या कामाच्या दर्जाच्या बाबतीत गावातील नागरिकांना साशंकता होतीच ती या पावसाने दूर केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. लोकप्रतिनिधीनी तात्काळ दखल घेत कारवाई करण्याची मागणी गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.