पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहर व परिसरात रविवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून अनेक भागांमध्ये घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करत पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी बाधित कुटुंबांना तात्काळ मदतीचे आश्वासन दिले.
हिवरा नदीला आलेल्या पुरामुळे पाचोरा शहरात सकाळपासूनच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी परिस्थितीची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांचे घरगुती साहित्य, अन्नधान्य, आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून अहवाल प्राप्त होताच नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देण्यात येईल.

या पाहणी दौऱ्यात आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार किशोर पाटील, तहसीलदार विजय बनसोडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांनी देखील आपत्तीग्रस्त नागरिकांना धीर देताना सांगितले की, शासन एनडीआरएफच्या निकषानुसार तात्काळ सर्वतोपरी मदत देईल. त्यांनी तहसीलदारांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले असून प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.
पाचोरा तालुक्यात गेल्या काही तासांत दीडशे मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील जनता वसाहत, बहिरम नगरसह अनेक भागांमध्ये पुराचे पाणी घरांमध्ये शिरले असून, तालुक्यातील खडकदेवळा, गाळण, नाचनखेडा गावांमध्येही पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. नगर परिषद आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मदत व बचावकार्य तात्काळ सुरू करण्यात आले असून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
शासनाच्या वतीने एसडीआरएफ पथक देखील या भागात तैनात असून ते आवश्यक ती मदत करत आहेत. जिल्हा प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी सतर्कतेने कार्य करत आहे. दरम्यान, आमदार किशोर पाटील यांनी संपूर्ण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.



