जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या शूर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या वतीने ‘सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याहस्ते सोमवारी ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी सैनिक कुटुंबिय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती लाभली.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर, तसेच निवृत्त कॅपटन मोहन कुलकर्णी आणि सेवानिवृत्त कर्नल व्ही. के. सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलनाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. या निधीतून माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबिय आणि वीर माता-वीर पत्नी यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. ध्वजदिन निधीसाठी मागील वर्षी सढळ हाताने मदत करणाऱ्या सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माजी सैनिकांच्या ज्या पाल्यांनी विविध शालेय आणि स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले, त्यांचाही गौरव करण्यात आला. यासोबतच देशासाठी सर्वोच्च त्याग केलेल्या वीर माता, वीर पिता, वीर पत्नी आणि माजी सैनिक विधवा यांचाही सत्कार करण्यात आला.



