यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सोशल मीडियावर एकमेकांना शिवीगाळ केल्याच्या किरकोळ कारणावरून जळगाव येथील एका १९ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून ठार मारल्याच्या खळबळजनक प्रकरणातील पाच संशयित आरोपींना न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावल पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या या आरोपींना गुरुवारी ४ डिसेंबररोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश आर. एस. जगताप यांनी त्यांना १० डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

जळगाव येथील समतानगरचा रहिवासी असलेला तुषार चंद्रकांत तायडे (वय १९) याने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक ‘रिल’ तयार करून पोस्ट केले होते. यामध्ये त्याने काही आक्षेपार्ह शिवीगाळ केली होती, याच गोष्टीचा राग मनात धरून संशयितांनी कट रचला. मंगळवार, २ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तुषार तायडे यावल-शेळगाव रस्त्यावरील बोरावल गावाजवळील पाटचारीजवळ दुचाकीवरून जात असताना, आरोपींनी त्याला अडवले. राहुल सोनवणे, विक्रम सोनवणे व त्यांच्या इतर साथीदारांनी मिळून तुषार यास लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. या जीवघेण्या मारहाणीत तुषार गंभीर जखमी झाला आणि मध्यरात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मयत तुषारचे वडील चंद्रकांत तायडे यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, त्यानुसार खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्यात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत, अविनाश सोनवणे (रा. सुजदे, ता. जळगाव), निलेश कोळी (रा. बोरनार, ता. जळगाव), कल्पेश इंगळे (रा. आसोदा), विजय सोनवणे (रा. सुजदे) यांच्यासह पाच संशयित आरोपींना काल रात्री अटक केली.
या पाचही आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, तपास आणि गुन्ह्यातील वापरलेल्या वस्तू जप्त करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने त्यांना सात दिवसांची (१० डिसेंबरपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत.



