अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात अजून ५ कोटींच्या विकासकामांना मंजुरी तथा प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यात महत्वपूर्ण रस्त्यांसह इतर विकासकामे मार्गी लागणार असल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत सुवर्ण जयंती नगरोथान महाअभियान आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलीत वस्ती सुधार योजनेतून ही कामे मंजूर झाली आहेत.यात प्रामुख्याने अत्यंत दुरवस्था झालेल्या रेल्वे उड्डाण पुल ते बंगाली फाईल कडून विप्रो कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याचा समावेश असल्याने या परिसरासह बोरीकाठच्या गावांची सोय होणार आहे. तसेच बस स्टँड शेजारील अत्यंत दैनी अवस्था झालेला गांधी नगरचा रस्ता आणि प्रताप महाविद्यालयाजवळील रेल्वे उड्डाणपूल ते प्रोफेसर कॉलनी पर्यंतच्या रस्त्याचा समावेश असून याशिवाय अनेक भागातील खुले भूखंड यातून विकसित केले जाणार आहेत.
विकास कामांना मंजुरी दिल्याबद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.