जळगाव (प्रतिनिधी) हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना शनिवारी रात्री ९.३० वाजता घडली़. या हाणामारीत लाठ्या-काठ्या तसेच चॉपरचा वापर झाल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़. अखेर रविवारी दुपारी दोन्ही गटांनी परस्परांविरूध्द तक्रार दाखल केली. त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
अधिक माहिती अशी की, कोळी पेठेतील राजू गोविंदा कोळी याचा शनिवारी रात्री हळदीचा कार्यक्रम होता़. त्यानिमित्ताने गल्लीतील मित्रमंडळी त्याठिकाणी बॅण्डच्या तालावर नाचत होते़. दरम्यान, त्याठिकाणी नाचणाऱ्या सागर सुरेश सपकाळे याला किशोर अशोक सोनवणे या तरूणाचा धक्का लागला़ अन् सागर याने किशोरला तोंडावर मारहाण केली़. वाद वाढू नये, म्हणून किशोर घरी निघून गेला़, त्याने घडलेला प्रकार वडील अशोक यांना सांगितल्यानंतर त्यांनी रात्री १०.३० वाजता हळदी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन सागर याला मुलाला का मारले ? याचा जाब विचारला. याचा राग येऊन त्याने अशोक सोनावणे यांना शिवीगाळ करीत लाकडी दांड्याने मारहाण केली़. त्याठिकाणी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या रमेश सोनवणे यांना सुरेश सपकाळे यानेही लोखंडी पाईपने मारहाण केली़. विशाल सैंदाणे याने चॉपरने किशोर याच्या हातावर वार केले़. नंतर विशाल बुनकर, सागर आणि राहुल सपकाळे या तिघांनी लाकडी दांड्याने किशोर याच्यासह त्याचे वडील व काकास मारहाण केली़ आणि तेथून पळ काढला़. किशोर हा काका व वडीलांसह रात्री पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आला़ मात्र, दुखापत अधिक असल्यामुळे पोलिसांनी आधी त्यास वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला़. त्यामुळे त्यांनी जिल्हा रूग्णालय नंतर खाजगी रूग्णालयात उपचार घेतला़ रविवारी किशोर याच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात सागर सुरेश सपकाळे, सुरेश त्र्यंबक सपकाळे, राहुल सुरेश सपकाळे, विशाल कैलास सैंदाणे, सागर उर्फ झंप्या आनंदा सपकाळे व विशाल बुनकर (सर्व रा़. कोळीपेठ) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
दरम्यान, दुसऱ्या गटाने दिलेल्या तक्रीरीनुसार, राजू कोळी याच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचत असताना सागर सपकाळे याचा धक्का किशोर सोनवणे याला लागला़ त्यामुळे दाघांमध्ये बाचाबाची झाली़ नंतर सागर हा घरी निघून गेला़ काही वेळानंतर किशोर सोनवणे, रमेश श्रावण सोनवणे, अशोक श्रावण सोनवणे, महेंद्र तुकाराम सोनवणे (सर्व रा़. कोळीपेठ) हे सागरच्या घरी आले व त्यांनी सागर याच्यासह त्याच्या वडीलांना लाकडी दांड्याने मारहाण केली़. तसेच त्यातील एकाने त्यांच्यावर चॉपरने वारही केला़. वाद सोडवण्यासाठी आलेल्या गणेश सपकाळे यालाही डोक्यावर लाकडी दांड्याने मारहाण केली़. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़. अखेर रविवारी सागर सपकाळे याच्या फिर्यादीवरून किशोर सोनवणे, रमेश सोनवणे, अशोक सोनवणे व महेंद्र सोनवणे यांच्याविरूध्द शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.