मासे पकडणे जीवावर बेतले; तरूणाचा तलावात बुडून मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मासे पकडण्यासाठी तलावावर गेलेल्या जळके-वसंतवाडी येथील ३५ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी उघडकीला आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

संजय पंडित मोरे (वय-३५) रा. जळके वसंतवाडी, ता. जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील जळके वसंतवाडी येथील रहिवाशी संजय मोरे हा तरूण आपल्या आईवडील, भाऊ व पत्नीसह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी २८ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास तो शिरसोली शिवारातील तलावात मासे पकडण्यासाठी गेला होता. तलावात गाळ असल्याने त्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. इकडे संजय घरी न आल्याने त्याचे कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला परंतू तो कुठेही आढळून आला नाही. बुधवारी २९ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह तलावाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोहेकॉ जितेंद्र राठोड, जळके वसंतवाडीचे पोलीस पाटील संजय चिमणकारे, शिरसोली येथील पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह बाहेर काढून सायंकाळी ७ वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Protected Content