जळगाव (प्रतिनिधी) आजच्या घडीला खासगी ट्युशन लावल्या शिवाय चांगले गुण तर सोडा पण पास देखील होता येत नाही. असा समज विद्यार्थ्यांचाच नव्हे तर खुद्द पालकांचा देखील आहे. परंतू सिध्दी विक्रांत पाटील या विद्यार्थिनीने जळगाव जिल्ह्यात मुलींमध्ये 96.20 टक्के मिळवून प्रथम येत, हा गैरसमज खोडून काढलाय. सिद्धी दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे संपादक विक्रांत पाटील यांची कन्या आहे.
सिध्दी विक्रांत पाटील हिने दहावी परीक्षेत 96.20 टक्के मिळवून जळगाव जिल्ह्यात मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकाविला आहे. ती ब.गो.शानबाग विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. विशेष म्हणजे सिद्धीने पहिली ते दहावी एकही खासगी ट्युशन लावलेली नव्हती. शाळेत व घरी अभ्यास करून सिद्धीने हे घवघवीत यश मिळविले आहे. सिद्धीचा अभ्यास तिची आई घरीच घ्यायची. एवढेच नव्हे तर, सिद्धीने सर्व छंद जोपासले. गायनाच्या 2 परीक्षा दिल्या. भरतनाट्यम, कथ्थक क्लास देखील लावला होता. नाटकात, स्पोर्ट्समध्येही सिद्धी सहभागी होत होती. सिद्धीला वाचनाची प्रचंड आवड असून तिच्याकडे स्वतः ची किमान 500 पुस्तके आहेत. कोणत्याही स्पर्धेत यश मिळविल्यावर सिद्धी कपडे किंवा बक्षीस न घेता पुस्तके मागायची. टिव्ही पाहिला, खेळली व मजेत अभ्यास केला. तिच्या वर्गातील 60 जणात ट्युशन नसलेली एकमेव विद्यार्थिनी होती. दरम्यान,भविष्यात सिद्धीला आयटी सेक्टरमध्ये करियर करायची इच्छा आहे.