Home राजकीय पहिले नकार, पण पतीच्या स्वप्नांसाठी जड अंतःकरणाने होकार ; सुनेत्रा पवार आज...

पहिले नकार, पण पतीच्या स्वप्नांसाठी जड अंतःकरणाने होकार ; सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेल्या पोकळीमध्ये आता एक भावनिक आणि निर्णायक अध्याय सुरू होत आहे. दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. सुरुवातीला या जबाबदारीसाठी त्यांनी स्पष्ट नकार दिला होता, मात्र पतीच्या राजकीय वारशासाठी आणि पक्षाच्या भवितव्यासाठी त्यांनी जड अंतःकरणाने या पदाचा स्वीकार केल्याचे समोर आले आहे.

आज संध्याकाळी ५ वाजता राजभवनात सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधीपूर्वी दुपारी २ वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होत असून, या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी अधिकृत निवड केली जाणार आहे. या निर्णयामुळे पक्षातील सध्याच्या अस्थिरतेला काही अंशी स्थैर्य मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे पुन्हा हाती घेण्यासाठी पवार कुटुंबात अंतर्गत चर्चा सुरू झाल्या होत्या. ज्या वेळी अजित पवार यांनी बंडाचा निर्णय घेतला होता, त्या काळात ते राजकीयदृष्ट्या एकटे पडले होते. एकीकडे अजित पवार आणि दुसरीकडे संपूर्ण पवार कुटुंब अशी स्थिती निर्माण झाली होती. त्या कठीण काळातही अजित पवार यांनी पक्ष उभा करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. तो पक्ष सुरक्षित ठेवणे आणि त्यांचे स्वप्न अधुरे राहू न देणे, हे पत्नी म्हणून सुनेत्रा पवार यांनी आपले कर्तव्य मानले.

या दु:खद प्रसंगात सुरुवातीला सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार नव्हत्या. मात्र, जर आपण पुढे आलो नाही, तर अजित पवार यांचे स्वप्न अपूर्ण राहील आणि पक्ष हातातून निसटू शकतो, याची जाणीव कुटुंबीयांनी त्यांना करून दिली. याच भावनिक आणि जबाबदारीच्या जाणिवेतून त्यांनी आधी पक्ष सावरणे आणि त्यानंतर विलीनीकरणाबाबत चर्चा पुढे नेण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच आधी शपथविधी घेण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतल्याचे बोलले जात आहे.

उपमुख्यमंत्रीपदासोबत सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणती खाती असणार, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थ खाते आणि इतर महत्त्वाची खाती होती. मात्र, सध्याच्या घडीला सुनेत्रा पवार या केवळ उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून, अर्थ खाते वगळता राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे कायम राहणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अर्थ खात्याची जबाबदारी पुन्हा त्यांच्याकडे दिली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. आजच्या शपथविधीत त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणताही मंत्री शपथ घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound