वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेचे ए-६४५ (आय) हे अपाचे हेलिकॉप्टर आज अमेरिकेतील अॅरिझोना राज्यातील मेसा शहरात स्थित विमानांच्या कारखान्यात भारताकडे हस्तांतरित करण्यात आले. भारताचे एअर मार्शल ए.एस. बुटोला यांनी यावेळी भारताचे प्रतिनिधित्व केले.
युद्धभूमीवर अत्यंत उपयुक्त असणाऱ्या २२ अत्याधुनिक अपाचे हेलिकॉप्टर्सचा करार भारताने अमेरिकेशी केला असून जुलै २०१९ पर्यंत सगळी हेलिकॉप्टर्स वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. कुख्यात दहशतवादी आणि अलकायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यासाठी याच लढाऊ हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आला होता. भारत आतापर्यंत रशियाकडून विकत घेतलेल्या मिग-३५ हेलिकॉप्टर्सचा वापर करत होता. ही हेलिकॉप्टर्स आता अत्यंत जुनी झाली असून भारताला नवीन हेलिकॉप्टर्सची गरज होती.
अपाचेसारखी अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स भारतीय वायुसेनेने कधीच वापरलेली नव्हती. त्यामुळे भारतीय वायुसेनेतील काही निवडक ऑफिसर्स आणि जवानांना हे हेलिकॉप्टर्स वापरण्याचे प्रशिक्षण अमेरिकेने दिले आहे. शत्रूच्या हद्दीत घुसून मोठ्या प्रमाणात विध्वंस करण्याची क्षमता या हेलिकॉप्टर्समध्ये असते. १९७५ मध्ये अमेरिकेने या हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली होती तर १९८६ मध्ये ही हेलिकॉप्टर्स पहिल्यांदा युद्धभूमीवर वापरण्यात आली होती. अमेरिकेशिवाय नेदरलॅंड्स ,इजिप्त ,इस्राइलच्या ताफ्यातही अपाचे हेलिकॉप्टर्स आहेत.
डोंगराळ भागात, कोणत्याही ऋतूमध्ये-पावसाळा, हिवाळा असो वा उन्हाळा ही हेलिकॉप्टर्स सहज आक्रमण करू शकतात. ५१६५ किलो वजन असलेल्या या विमानांचा ताशी वेग ३६५ किमी इतका आहे. काही क्षणांमध्ये शत्रूचे रणगाडे उद्ध्वस्त करण्याची क्षमता या हेलिकॉप्टर्समध्ये आहे. अफगाणिस्तान आणि इराकमध्ये झालेल्या युद्धांमध्ये अमेरिकेला या हेलिकॉप्टर्सची चांगलीच मदत झाली होती.