जम्मू-कश्मीरातील यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार; बस दरीत कोसळून नऊ जण ठार

जम्मू-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी रविवारी वैष्णोदेवी यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला. या हल्ल्यामुळे बस दरीत कोसळून नऊ जण ठार झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. शिव खोरी मंदिर येथून हे यात्रेकरू कटऱ्याला जात होते. या घटनेत ३३ जण जखमी झाले. एकीकडे नरेंद्र मोदी यांच्या सलग तिसऱ्या शपथविधीची दिल्लीत तयारी सुरू असताना रविवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमाराला भाविकांच्या बसवर गोळीबार झाला.

रियासीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहित शर्मा यांनी सांगितले की, पौनी भागाजवळ तीर्थ गावाजळ झालेल्या या हल्ल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून बस खोल दरीत कोसळली. बचावकार्य पूर्ण झाले असून नऊ मृतदेह हाती आले आहेत. मृतांची ओळख पटलेली नाही, मात्र प्राथमिक माहितीवरून ते सर्वजण उत्तर प्रदेशातील असल्याची शक्यता आहे. जखमींना नजिकच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. एका हल्लेखोराने चेहरा झाकून घेतला होता आणि त्याने बसवर गोळीबार केल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. जम्मूमधील राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांत अलिकडे दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, रियासी जिल्हा तुलनेने शांत होता. रविवारच्या घटनेमुळे या भागातील हिंसाचारात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content