नवी दिल्ली वृत्तसंस्था । एयर स्ट्राईकमुळे चवताळलेल्या पाकने नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू केला असून भारताने याला जोरदार प्रत्युत्तर देत पाकच्या ५ चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.
काल पहाटे भारतीय वायूदलाने केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली आहे. भारताने अतिशय अचूकपणे जैशसह अन्य संघटनांच्या तळांवर हल्ला करून त्यांना उद्ध्वस्त केल्यामुळे दहशतवाद्यांचेही कंबरडे मोडले आहे. यामुळे चवताळलेल्या पाकने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच एलओसीवर काल रात्रीपासून जोरदार गोळीबार सुरू केला आहे. तथापि, भारतीय जवानांनी याला जोरदार प्रत्युत्तर देऊन पाकच्या पाच सैनिकांना यमसदनी पाठविले आहे. अजूनही नियंत्रण रेषेवर पाकचा गोळीबार सुरूच असल्याचे वृत्त आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार पाकच्या पाच चौक्यादेखील या कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या हल्ल्यात भारताचे १० जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे.