Home क्राईम वडिलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी जळगावात भर चौकात गोळीबार !

वडिलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी जळगावात भर चौकात गोळीबार !


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, मंगळवारी १० मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वाल्मिक नगरातील घरकुल चौकात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. आपल्या वडिलांना झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अनिल राठोड नामक तरुणाने दोन राऊंड फायर केले. सुदैवाने, या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र भरवस्तीत झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक नगरातील श्रीराम चौकात राहणारे रसाल राठोड (वय ४८) हे नेरीनाका स्मशानभूमी परिसरातून जात असताना, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात राठोड यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ आपला मुलगा अनिल राठोड याला दिली.

वडिलांना मारहाण झाल्याचे कळताच संतापलेला अनिल राठोड हा आरोपींच्या शोधात निघाला. वाल्मिक नगरातील घरकुल चौकात त्याला वडिलांना मारहाण करणारे तिघे जण बसलेले दिसले. अनिलने आपली दुचाकी त्यांच्या दिशेने वळवली आणि काही समजण्याच्या आत कमरेला लावलेल्या गावठी कट्ट्यातून त्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच धावपळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून दोन्ही गटातील संशयितांची धरपकड सुरू केली. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या गटातील प्रशांत चौधरी आणि हिमांशू सांखला यांना ताब्यात घेतले आहे, तर दुसऱ्या गटातील सुनील राठोड यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

मुख्य आरोपी अनिल राठोड हा गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून, रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे जळगाव शहरात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत शनी पेठ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound