अमृतसर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख व पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यासह शिरोमणी अकाली दलाचे नेते श्री अकाल तख्त साहिब यांनी सुनावलेल्या धार्मिक शिक्षेनुसार सेवा करत असताना सुवर्ण मंदिर परिसरात बुधवारी गोळ्या झाडण्यात आल्या. सुखबीर सिंग बादल यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होता. मात्र ते थोडक्यात वाचले. या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
नारायण सिंह चौरा असे या हल्लेखोराचं नाव असून तो एकेकाळचा दहशतवादी आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो भूमिगत होता. घटनेच्या वेळी नारायणसिंह चौरा सुखबीर सिंग बादल यांच्या जवळ उभा होता. सुखबीर बादल यांच्यावर गोळीबार करताना जवळच उभ्या असलेल्या एका सेवादारानं चौराला धक्का दिला. त्यामुळं सुखबीर सिंग बादल बचावले.
पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाच्या सरकारने २००७ ते २०१७ या काळात केलेल्या चुकांसाठी बादल आणि इतर नेत्यांना ‘तन्खा’ (धार्मिक शिक्षा) सुनावताना अकाल तख्तमधील शीख धर्मगुरूंनी सोमवारी ज्येष्ठ अकाली नेत्याला सेवादार म्हणून काम करण्याचे आणि सुवर्ण मंदिरात भांडी धुण्याचे आणि शूज स्वच्छ करण्याचे निर्देश दिले होते. ही शिक्षा भोगण्यासाठी बादल व त्यांचे सहकारी सध्या सुवर्ण मंदिरात गेले आहेत.