अमळनेर (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यातील धाबे या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे अचानकएका निराधार महिलेच्या घराला आग लागून अंदाजे पन्नास हजाराचा ऐवज जळून खाक झाल्याची घटना रविवारी घडली आहे.
या संदर्भात अधिक असे की, धाबे येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या मागे एकटया राहणाऱ्या निराधार महिला अनुबाई मानसिंग भिल यांनी आपल्या पत्र्याच्या घराला लागून उन्हाळ्यामुळे स्वतः राहण्यासाठी व बोकड बांधण्यासाठी कुडाची झोपडी बनविली होती. त्या झोपडीला रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. गावकरींनी धाव घेत अगोदर झोपडीतील आठ बोकड बाहेर काढले. थोड्याच वेळात आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे झोपडीत असलेले संसारोपयोगी कपडे, धान्य, आंथरुण व १२ हजार २०० रुपयाची रोकड जळून खाक झाली.
या आगीमुळे दसनुर तडवी यांची झोपडीही थोडी जळाली. श्रीमती बनुबाई यांची झोपडी काही प्रमाणात जळाली तर लांब अंतरावर असणाऱ्या लिंबाच्या झाडालाही झळा पोहचल्या. गावकरींनी शर्थीचे प्रयत्न करून आग अटोक्यात आणली. पारोळा नगर पालिकेची अग्नीशमन गाडीही वेळेवर पोहचली म्हणून मोठा अनर्थ टळला. आज सकाळी ९ वाजता धाबे हिरापूर तलाठी के.टी.सानप यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. श्रीमती अनुताई या एकटया व निराधार महिला असुन बोकड पालन व खरेदी विक्रीतुन त्या आपला उदरर्निवाह करतात. सर्वच जळुन खाक झाल्यामुळे त्या हवालदिल झाल्या आहेत. त्यांना शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे, तलाठी के.टी.सानप, धाबे येथील वीर एकलव्य व बजरंग ग्रुपचे रविंद्र पाटील यांनी धीर देत मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. श्रीमती अनुताई भिल यांनीही मदत मिळण्याची विनंती केली आहे.