पुणे (वृत्तसंस्था) देवाची ऊरळी येथील सासवड रोडच्या लगत असलेल्या राजयोग होलसेल साडी डेपोच्या दुकानाला पहाटे आग लागली. या आगीमध्ये धुराने गुदमरून आणि होरपळून पाच कामगारांचा मृत्यू असून सुमारे तीन कोटीचे नुकसान झाले आहे.
देवाची ऊरळी गावातील राजयोग साडी सेंटरला पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत राकेश रियाड (वय २२),धर्मराम वाडियासार (वय २५),राकेश मेघवाल (वय २५), सुरज शर्मा (वय २५) हे चारही राहणार राजस्थान तर धीरज चांडक (वय २३),रा. लातूर असे मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. दरम्यान, पहाटे सव्वा चारच्या दरम्यान या दुकानात आतमध्ये झोपलेल्या कामगारांचा मॅनेजरला आग लागल्याचा फोन आला होता. चोरी होऊ नये या उद्देशाने दुकानाला बाहेरून कुलूप लावण्यात येत असे. आतमध्ये पाच कामगार झोपले होते. शॉर्टसर्किटने आग लागल्याने आम्हाला गुदमरत आहे. बाहेर पडता येत नाही. असा फोन दुकानच्या मॅनेजरला आला. मॅनेजर तेथे जाईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि आठ ते दहा टॅंकरने ही आग विझविण्यात आली. सकाळी पावणेसातच्या सुमारास या दुकानामधून पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.