पंढरपूर । येथील विठ्ठल मंदिर खुले करण्याच्या मागणीसाठी काल करण्यात आलेल्या आंदोलनामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह सुमारे १२०० जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पंढरपुरात काल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन केले. दरम्यान, या आंदोलनाप्रकरणी त्यांच्यासह एक हजारांपेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकाश आंबेडकर यांनी विश्व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसमवेत ३१ ऑगस्ट रोजी पंढरपुरात आंदोलन केलं. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन प्रतिबंधात्मक आदेश असताना प्रकाश आंबेडकर यांनी लोकांचा जमाव जमवला. यावेळी मास्क घातला नाही तसंच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही.
संचारबंदी व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियमामधील तरतुदीचे उल्लंघन करुन ठिय्या आंदोलनासाठी एकत्र जमा होऊन घोषणाबाजी केली. यामुळे प्रकाश आंबेडकर, अरुण महाराज बुरघाटे, आनंद चंदनशिवे, धनंजय वंजारी, अशोक सोनोणे, हभप नामद महाराज, बबन शिंदे, सागर गायकवाड, रवी सर्वगोड व गणेश महाराज शेटे यांच्यासह आंदोलकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.