मुंबई प्रतिनिधी । १०० कोटींच्या वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचे निवासस्थान व कार्यालयांवर सीबीआयने छापे मारल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबईचे माजी आयुक्त परमबीरसिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याला दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते असा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती. यावरून अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला असून त्यांची सीबीआय चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, रात्री उशीरा सीबीआयने त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला असून पहाटे त्यांच्या घरासह कार्यालयांवर छापे मारण्यात आले आहेत.
सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले,. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने देशमुख यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.