मुंबई प्रतिनिधी । ओवायओ हॉटेल्स अँड होम्सचे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितेश अग्रवाल यांच्यासह अन्य सहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून हॉटेलच्या रुम्सचं 35 लाख रुपये भाडं ओयोने दिलं नसल्याचा आरोप एका हॉटेल मालकाने केला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरूच्या डोमलर भागातील ‘हॉटेल रॉक्सेल इनचे’ मालक बेट्स फर्नांडीस यांनी ओयो हॉटेल्सच्या संस्थापकाविरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. “ओयो”ने हॉटेलमधील रुम बुक केल्या होत्या आणि त्यासाठी दर महिन्याला ७ लाख रुपये भाडं ठरलं होतं. पण, मे महिन्यापासून आतापर्यंत एकही पैसा मिळालेला नाही, असे बेट्स यांनी आपल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे. रितेश अग्रवाल आणि अन्य सहा जणांना गुरूवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रितेश अग्रवाल यांच्याशिवाय पोलिसांनी ओवायओच्या रोहित श्रीवास्तव, माधवेंद्र कुमार, गौराब डे, प्रतीक अग्रवाल, मंजीत सिंह आणि मृणाल चक्रवर्ती यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केलाय. तर, नागरी वाद खळबळजनक बनविण्यासाठी आणि लक्ष वेधण्यासाठी अयोग्य कायदेशीर मार्गांचा वापर केल्याबाबत काउंटर एफआयआर त्या हॉटेल मालकाविरोधात करणार असल्याचं ओयोने म्हटलं आहे.