जळगाव (प्रतिनिधी) अपघातांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून रस्ते अपघातांमागील कारणांचा शोध घेवून उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी केशव पातोंड, राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता चंद्रकांत सिन्हा, हितेश अग्रवाल, रवींद्र सपकाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. पाटील, महानगरपालिकेचे शहर अभियंता सुनील भोळे, विद्युत विभाग प्रमुख एस. एस. पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले, रस्ते अपघातांचे वाढलेले प्रमाण पाहता प्रत्येकाने दक्षता बाळगावी. अपघतांचे प्रमाण कमी होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा पाठलाग करताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत संबंधित वाहनांचे क्रमांक घेवून कार्यवाहीचे निर्देश द्यावेत. तसेच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी तपासणी नाके कार्यान्वित करावेत. जेणेकरुन अपघातांचे प्रमाण कमी होईल.
राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती द्यावी. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांवर गतिरोधक तयार करावेत. नागरिकांनीही स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करावा. त्याची सुरवात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वत:पासून करावी. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिले.
रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होवून अपघातग्रस्तांना तत्काळ दिलासा मिळण्यासाठी समन्वय समिती गठित करण्यात यावी. या समितीचे समन्वयक म्हणून उपप्रादेशिक कार्यालयातील सहाय्यक परिवहन अधिकारी काम पाहतील. ही समिती अपघात झाल्यानंतर दोन दिवसांत आपला अहवाल कारण मीमांसा व उपाययोजनेसह सादर करेल, असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले.