यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथील इम्रान युनूस पटेल या तरूणाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या तरुणाच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मंगळवारी एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यांनी मृताच्या हात मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
२९ ऑगस्ट रोजी सुरेश आबा नगरातील रहिवासी असलेल्या इम्रान पटेलची कोयत्याने हल्ला करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर एमआयएमचे पदाधिकारी जियाभाई बागवान, रैय्यान जागीरदार, आबीद खान, महिला अध्यक्ष छाया कदम यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ थोरबोले यांची भेट घेतली.

मयत इम्रान पटेलचे कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे आहे. कुटुंबातील कर्ता तरुण गेल्याने त्यांच्यावर मोठे संकट आले आहे. एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी या परिस्थितीत त्यांना धीर देत, या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे सांगितले. तसेच, दोषींना कठोर शासन व्हावे अशी मागणीही त्यांनी यावेळी पोलिसांकडे केली. यावेळी जळगावचे माजी नगरसेवक हाजी युसूफ खान, इम्रान शेख, आसीफ खान, तस्लीम पिंजारी, सद्दाम शेख, शाकीर शेख यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



