
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धनगर समाजातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात आर्थिक पाठबळ देणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने ही योजना राबवली जात असून, ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, त्यांना भोजन, निवास आणि शैक्षणिक साहित्यासाठी थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते.

ही योजना अशा विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांनी इयत्ता १२ वी नंतरच्या विविध तांत्रिक, व्यावसायिक तसेच अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतला आहे, परंतु त्यांना शासकीय वसतिगृहात जागा मिळाली नाही. विशेषतः, जळगाव जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्र, विभागीय शहरे तसेच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेत बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी. अशा पदवी अभ्यासक्रमांमध्ये, तसेच एम.ए., एम.एस.सी. अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. हे अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर दि. १७ ऑगस्ट २०२५ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. कोणताही अर्ज ऑफलाइन पद्धतीने किंवा कार्यालयात प्रत्यक्ष जमा केला जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. दरम्यान, तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वेळापत्रकानुसार अर्ज प्रक्रिया जाहीर केली जाईल.
या योजनेसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास विद्यार्थ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जळगाव कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन योगेश पाटील, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जळगाव यांनी केले आहे. धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपले शिक्षण पूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.



