अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेने रंगत आणली आहे. दहिवद आणि अनोरे गावात ‘काँटे की टक्कर’ असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे अनोरे गावाला पुढाऱ्यांनी आर्थिक मदत दिली आहे. तर दहिवदला पुढाऱ्यांची आर्थिक मदत नसतानाही दुष्काळाशी लढा देण्यासाठी एकत्र येत गावकऱ्यांनी आर्थिक मदत उभारली आहे.
दहिवद गावाच्या लोकनियुक्त सरपंच सुषमा वासुदेव पाटील यांनी अनोखी संकल्पना पुढे आणली आहे. सुषमा देसले यांच्या संकल्पनेनुसार गावात पहिल्याच पाण्यात १ कोटी लीटर पाणी जमिनीत मुरवले जाणार आहे. विशेष म्हणजे हे पहिल्याच पावसाचे पाणी पहिल्याच टप्प्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा प्रश्न सोडवेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. या कामी ग्राम विकास अधिकारी संजीव सैंदाणे यांची देखील महत्वाची भूमिका आहे.
दहिवद गावात ९ ते १० विहिरी आहेत. या विहिरी गावातच आहेत. यात ८ ते ९ दगडी आड आहेत. हे आड थोडे खोदून स्वच्छ केले जाणार आहेत. कारण या आडांनी आता तळ गाठला आहे. लोकसहभागातून हे काम होणार आहे. या आडांमध्ये सिमेंटचे छत असलेल्या घरांवरील पाणी थेट पाईपने सोडले जाणार आहे. दहिवद गावाची ५० वर्षापूर्वीची ही पाणीपुरवठ्याची सोय पुन्हा पु्र्रनजिवित केली जाणार आहे. यामुळे दहिवद गावातील पाण्याची पातळी पहिल्याच पावसात तर वाढणारच आहे. पाण्याचा प्रश्न पहिल्या एक-दोन पावसातच सोडवण्याचा हा प्रयत्न आहे. यासोबत दहिवद गावातील पाय विहिर दुरूस्त करून त्यातही पावसाचे पाणी सोडले जाणार आहे.