धानोरा(प्रतिनिधी) येथिल आदिवासी तरुणीचा बारावीत विद्यालयातुन प्रथम क्रमांक येऊनही संस्थेतर्फे तिचा सत्कार करण्यात आला नव्हता. अन्य तीन गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार मात्र संस्थेने केला होता. त्यावेळी ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’ने हा प्रकार निदर्शनास आणून दिला होता. त्या वृत्ताची दखल घेत भुसावळ येथील संस्थेने तिचा संस्थेतर्फे सत्कार करुन मान-सन्मान केला. त्यामुळे न्याय मिळवुन दिल्याबद्दल त्या विद्यार्थिनीने ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’ आणि डॉ.बी.आर. आंबेडकर मोफत अभ्यासिकेचे आभार मानले आहेत.
याबाबत सविस्तर असे की,दि २८ रोजी बारावीचा अॉनलाईन निकाल जाहीर झाला होता. परंतु येथिल झि.तो. महाजन माध्यमिक व ना.भा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये संपूर्ण निकाल न पाहता तीन मुलींना प्रथम, द्वितीय व तृतिय ठरवून वर्तमानपत्रातुन,सोशल मिडीयावर प्रसिद्धी दिली गेली होती. पण येथिल डॉ. आंबेडकर मोफत अभ्यासिकेचे संचालक प्रशांत सोनवणे यांना जाहीर करण्यात आलेल्या निकालात काही तरी गडबड झाली आहे, असे समजले. त्यांनी संबंधित तरुणीचे घर गाठून घडलेला प्रकार उजेडात आणला. अश्विनी अशोक पारधी हिला प्रथम आलेल्या मुलीपेक्षा दोन गुण जास्त होते. यानिमित्ताने अभ्यासिका मार्फत तिचा संपूर्ण परीवारासह पेढे भरवुन, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पुढील शिक्षणात अभ्यासिकेमार्फत मोफत पुस्तके पुरवली जातील, असेही जाहीर करण्यात आले.
संस्थेने चार दिवसांनी केला सत्कार निकाल लागल्यानंतर प्रथम आलेल्या तरुणीचा सत्कार उशिराने म्हणजे चार दिवसांनी विद्यालयातील एका कार्यालयात संस्थेच्या वतीने करण्यात आला. एक आदिवासी तरुणी बारावीत प्रथम आली, पण अन्य तीन मुलींना प्रथम, द्वितीय, तृतिय असल्याचे जाहीर कुणी व कसे केले ? तसेच वर्तमानपत्रातुन, सोशल मिडीयाद्वारे निकाल पूर्ण न बघता कसा जाहीर केला गेला? याबाबत भुसावळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, स्थानिक चेअरमन, शालेय समितीचे सदस्य, प्राचार्य यांनी कुठल्याचप्रकारे शहानिशा केलेली नसल्याने गरीब तरुणीवर जाणीवपूर्वक अन्याय केला असल्याची गावात चर्चा आहे. दरम्यान, सदर तरुणीला न्याय मिळवुन डॉ. आंबेडकर मोफत अभ्यासिकेचे संचालक प्रशांत सोनवणे यांचेही कौतुक केले जात आहे.