जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील जळगाव खुर्द गावाजवळ पुलाच्या बांधकामस्थळी उत्तर प्रदेशातील तीन मजुरांचा अज्ञात वाहनाखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (११ मार्च) पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. ही माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या भीषण अपघातात योगेश कुमार राजबहादुर (वय १४, रा. सीढपुरा, कासगंज, उत्तर प्रदेश), शैलेंद्रसिंग नथूसिंग राजपूत आणि भूपेंद्र मीथीलाल राजपूत (दोघे रा. दलेलपूर, उत्तर प्रदेश) यांचा मृत्यू झाला होता. हे तिघेही मजूर जळगाव खुर्द येथील पुलाच्या कामावर होते. सोमवारी ११ मार्च रोजी रात्री काही मजूर गावाला निघून गेले, मात्र हे तिघे बांधकामाच्या ठिकाणीच झोपले होते. पहाटे अचानक भरधाव वाहन त्यांच्या अंगावरून गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सखोल चौकशी सुरू केली. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या मदतीने पोलिसांना माहिती मिळाली की अपघात (एमएच १९ सीवाय ३१९१) क्रमांकाच्या मुरुमाने भरलेल्या डंपरने केला आहे. या माहितीच्या आधारे संशयित आरोपी प्रकाश सुदामाकुमार पटेल (वय २३, रा. उफरवली, मध्य प्रदेश) याला नशिराबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले.
मृत मजूर उत्तर प्रदेशातील आपल्या गावी होळी साजरी करण्यासाठी निघण्याच्या तयारीत होते. सकाळी आवरून ते गावी जाणार होते, पण दुर्दैवाने त्यांचा प्रवास सुरू होण्याआधीच त्यांना मृत्यूने गाठले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.सी. मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. हेड कॉन्स्टेबल उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, जावेद शहा, राहुल वानखेडे यांनी कारवाईत मोलाची भूमिका बजावली.